आदर्श कला, वाणिज्य व विज्ञान’ महाविद्यालयाची सुरुवात सन २००८ साली गणरायाच्या प्रांगणामध्ये झाली. शिक्षणाच्या ओसाड माळरानांवर उच्च शिक्षणाचे बीजारोपण केले. शेतकरी, कष्टकरी व शेतमजुरांच्या मुलांसाठी हे महाविद्यालय वरदान ठरले आहे. यापूर्वी येथील विद्यार्थ्यांना उच्चशिक्षणासाठी भोकरदन, जाफ्राबाद किंवा जालना येथे जावे लागत असे. गावापासून ३० ते ३५ कि.मी. प्रवास करून उच्च शिक्षण घेणे गरीब विद्यार्थ्यांना परवडणारे नव्हते. अनेक विद्यार्थी १२ वी नंतर औद्योगिक वसाहतीमध्ये कामाला गेले होते. काही विद्यार्थ्यांनी शैक्षणिक विश्रांती घेऊन आपल्या शेतीकडे मोर्चा वळविला. मुलींच्या संदर्भात उच्च शिक्षण जवळपास संपुष्टात आले होते. इच्छा असूनही दुर्बल घटकांतील विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण घेता येत नव्हते.
ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक प्रवाहामध्ये जोडण्यासाठी व ‘बहुजन हिताय बहुजन सुखाय’ हे ब्रीदवाक्य सार्थ करण्यासाठी महाविद्यालयाची सुरुवात झाली. सुरुवातीला विद्यार्थ्यांचा प्रतिसाद अल्प राहिला. महाविद्यालयाच्या प्रसिद्धीप्रमाणे विद्यार्थ्यांची संख्या वाढत गेली. शिक्षणाच्या प्रवाहापासून बाहेर गेलेले परिसरातील विद्यार्थी आशेचा नवीन किरण घेऊन उच्च शिक्षणाकडे वळाले. अनेकांनी गॅप प्रमाणपत्रे घेऊन महाविद्यालयामध्ये प्रवेश मिळविला.
आता महाविद्यालयाची स्थिती आणि गती वाढली आहे. विद्यार्थ्यांपेक्षा विद्यार्थिनींची संख्या मोठ्या प्रमाणात वाढते आहे. शहरात मिळणाऱ्या शैक्षणिक सुविधा ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना मिळवून देण्यासाठी संस्था प्रयत्नशील आहे, क्रीडा, विज्ञान, कला कौशल्यांची शैक्षणिक साधने महाविद्यालयाने विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध करून दिली आहे. बी. ए., बी. कॉम., बी. एस्सी. विद्याशाखेंतर्गत अनेक विषय विद्यार्थ्यांसाठी ऐच्छिक पर्याय म्हणून उपलब्ध आहे. कलाशाखेमध्ये संस्कृत, मराठी, हिंदी, इंग्रजी, पाली, इतिहास, भूगोल, राज्यशास्त्र, अर्थशास्त्र, मानसशास्त्र, ग्रंथालयशास्त्र, शारीरिक शिक्षण आदी विषय विद्यार्थ्यांच्या आवडीनुसार उपलब्ध आहे.
गावापासून बाहेर भोकरदन मुख्य मार्गावर महाविद्यालय आहे. भव्य क्रीडांगण, देशी-विदेशी खेळांचे शैक्षणिक साहित्य, समृद्ध ग्रंथालय विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध आहे. सर्व विद्याशाखेतील प्राध्यापकवृंद उच्चविद्याविभूषित आहे. स्वतंत्र अध्यापन कक्ष, अद्ययावत, प्रयोगशाळा, राष्ट्रीय सेवा योजना, आजीवन शिक्षण विस्तार सेवा विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी उपलब्ध आहे. विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास करून तो स्वयंपूर्ण घडविण्यासाठी महाविद्यालय प्रयत्नशील आहे.